नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- फर्नांडीसवाडी फायरिंग प्रकरणातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या उज्जैनवाल टोळीचा प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल याला उपनगर पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या शिताफिने अटक केली आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
१० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री जयभवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व व हप्ते वसुलीवरून वाद झाल्याने धारधार शस्त्र व दांडक्यांनी सज्ज होऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविण्यात आली होती. या दरम्यान फायरिंग करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
घटनेनंतर आरोपी राहुल उज्जैनवाल हा फरार झाला होता. त्याचा शोध गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता. पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने संशयिताचा मागोवा घेतला.
३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल हा नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गोसावीवाडी परिसरात येणार आहे. तत्काळ सापळा रचून पथकाने कारवाई केली. पोलिसांचे अस्तित्व लक्षात येताच आरोपीने पळ काढला, मात्र पोलिसांनी परिसरातील गल्लीबोळात पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे आढळली. एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून हीच पिस्तुल फर्नांडीसवाडी फायरिंगमध्ये वापरल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पोउनि प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन,गौरव गवळी, जयंत शिंदे,अनिल शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड पंकज कर्पे, संदीप रघतवान, सुरज गवळी प्रवीण सांगळे मुकेश शिरसागर सतीश मढवई मयुरी विझेकर आणि रात्र गस्त अधिकारी पोउनि निखील कोरपड यांनी सहभाग घेतला. उपनगर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.