
१३ ऑक्टोबर २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वडिलोपार्जित शेतीच्या वादातून भावाने टोळक्याच्या माध्यमातून भावावर जीवघेणा हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गौरव दत्तू सोनवणे याचे व आरोपी प्रमोद कचरू सोनवणे (वय 30, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांचे वडिलोपार्जित शेतीवरून वाद होते. या वादातून प्रमोदने गौरवला जिवे मारण्याचे ठरविले.
प्रमोदने अहिल्यानगरमधील सहा-सात गुंडांना सुपारी देत गौरवला जिवे मारण्यास सांगितले. त्यानुसार या गावगुंडांनी गौरव व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून ते एका गाडीने कोपरगावच्या दिशेने निघून गेले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केले. सोमठाण देश गावाकडे जाताना पोलिसांनी त्यांना धुळगाव शिवारात थांबण्याचा इशारा केला होता. पोलिसांना पाहून ही गाडी न थांबता त्यांनी येवल्याच्या दिशेने भरधाव गाडी चालविली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत दोन्ही वाहने कोपरगाव रोडवर आसरा लॉन्सच्या समोर अडवली.
या गाड्यांमधील आठ इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन आरोपी फरारी झाले आहेत. या आरोपींपैकी चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून, इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते सध्या 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले आहेत. गौरवला मारहाण करताना आजूबाजूचे ग्रामस्थ आल्याने गौरवचा जीव वाचला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 900 रुपये किमतीची तीन काडतुसे, 200 रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते, 100 रुपये किमतीचा लोखंडी पाईप, 250 रुपये किमतीचे फावड्याचे पाच लाकडी दांडके, 10 लाख रुपये किमतीची ह्युंडाई व्हेन्यू कार, पाच लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार, 80 हजार रुपये किमतीचे आठ स्मार्ट मोबाईल असा एकूण 16 लाख 11 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राजेंद्र सुधाकर जगताप (वय 27), विलास बबन आयनर (वय 33), प्रमोद कचरू सोनवणे (वय 30), हरिहर भागीरथ औटे (वय 23), शरद निवृत्ती चोपडे (वय 41), अक्षय अशोक राजळे (वय 23), साहिल मेहताब शेख (वय 19) व प्रदीप माणिक वायकर (वय 26) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Copyright ©2025 Bhramar