पंचवटीत महिला हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली खंडणी नंतर मॅनेजरला जीवे मारण्याचा केला प्रयत्न
पंचवटीत महिला हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली खंडणी नंतर मॅनेजरला जीवे मारण्याचा केला प्रयत्न
img
दैनिक भ्रमर
मालेगाव स्टॅन्ड वरील एका महिला हॉटेल व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी 15 जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 19 फेब्रुवारी 2025 रात्री ११.३० ते दिनांक 26 फेब्रुवारी 2025 या सात दिवसांच्या कालावधीत फिर्यादी यांच्या मालेगाव स्टँडवरील न्यू पंजाब रेस्टॉरंट अँड बार येथे संशयित मामा राजवाडे व त्याचे साथीदार बाबासाहेब बढे, प्रवीण कुमावत, लखन पवार, संदीप पवार, योगेश पवार, प्रकाश गवळी व इतर तीन ते चार जण पन्नास हजार रुपये हप्ता मागणीसाठी आले होते.

त्यावेळी फिर्यादी महिलेने हा हप्ता देण्यास नकार दिला. हफ्ता न दिल्याने आरोपींनी महिलेला हॉटेलची तोडफोड करण्याची धमकी दिली होती. त्याच रात्री बाबासाहेब बढे, प्रवीण कुमावत, लखन पवार, संदीप पवार, योगेश पवार, प्रकाश गवळी आणि इतर तीन ते चार जण या बारमध्ये फुकट दारू पिण्यासाठी आले होते.

त्यांनी फुकट दारू मागितली त्यावेळी फिर्यादी महिलेने त्यांना नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने संशयतांनी फिर्यादी महिलेचा रस्ता अडवून शटर बंद करण्याचा प्रयत्न करून हप्ता न दिल्यास बार बंद पाडण्याची धमकी त्यांना दिली. मामा राजवाडे मागेल तेव्हा हप्ता देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रकाश गवळी याने फिर्यादी महिलेचे दोन्ही हात खेचले.

त्यावेळी बाबासाहेब बढे यांनी फिर्यादी महिलेला दोन्ही हातांनी मागून पकडून फिर्यादीच्या स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी संशयित धीरज शर्मा, राहुल बागमार, चेतन कवरे यांनी मोठमोठ्याने आरडा ओरड करून शिवीगाळ करत "तुम्ही जास्त माजलेत, तुम्ही मामा राजवाडेच्या माणसाला फुकट पार्सल देत नाही, हफ्त्याचे पैसे देत नाही काय, तुमचे हात पाय तोडून तुमच्या माज जिरवतो, तुमचे हॉटेल कसे चालू ठेवता तेच पाहतो" असे म्हणत धमके दिली.

नंतर 26 फेब्रुवारी 2025 रोजी मामा राजवाडेने हॉटेलचे मॅनेजर राहुल नंदन यांना फोन करून त्यांच्या ऑफिसवर बोलावून घेतले. त्यावेळी बाबासाहेब बढे, योगेश पवार, प्रकाश गवळी, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार व प्रवीण कुमावत या टोळक्याने घोळका करून "तू मामा राजवाडेच्या लोकांना आडवा येतो का रे, जास्त मध्ये मध्ये करतो, आम्हाला हप्ता देत नाही" असे म्हणून लोखंडी रॉड व कोयता ने त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यानंतर नंदन यांच्या डोक्यास व हातात दुखापत करून डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मामा राजवाडे व त्याच्या साथीदारांची परिसरात दहशत असल्याने त्यांच्या भीतीपोटी फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देत नव्हत्या असे त्यांनी सांगितले. परंतु मामा राजवाडे व त्याच्या साथीदारांवर कारवाई झाल्याने मला धीर देऊन आपण देखील तक्रार दिल्यास आपल्याला देखील न्याय मिळेल असे समजावून सांगितले.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group