गोदाघाटावर झोपलेल्या युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
गोदाघाटावर झोपलेल्या युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी) :- गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीजवळील अमृततुल्य चहाच्या शटरजवळ झोपलेल्या एका २६ वर्षीय युवकावर दोघांनी कोयत्याने वार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

वैभव अश्रुबा नरवाडे (वय २६, रा. तारवाला नगर, लामखेडे मळा, पिंपळेश्वर महादेव मंदीराचे बाजुला, दिंडोरी रोड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैभव नरवाडे हा दुतोंड्या मारुतीजवळ एका ठिकाणी झोपलेला होते. आज पहाटे पहाटे दोन वाजेच्या सुमारास दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. नरवाडे हा मरण पावल्याचे समजून हल्लेखोर पसार झाले. मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले असून उपचार सुरू आहेत.

वैभव रविवारी मध्यरात्री दुतोंड्या मारूती जवळील अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळील शटरजवळ झोपला होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्याच्या डोक्यावर जोरात घाव घातला गेला. त्यामुळे जाग आलेल्या नरवाडेने पाहिले असता संशयित कृष्णा पांडे आणि साथीदाराच्या हातात कोयते दिसले.

नरवाडे जागा झाल्याचे पाहून दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रतिकारास न जुमानता उजव्या हातावर, डाव्या पायावर वार केले. त्यानंतर नरवाडे मेला असे समजून हल्लेखोर पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सुनिल पवार, सहायक सतिष शिरसाठ, शरद पाटील, उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पांडेसह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोघे संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वैभवची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group