नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड येथील दरोड्याचा मोठा कट उधळण्यात गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. विहित गाव बागुल नगर परिसरात वालदेवी नदी पुलाजवळ गस्त घालत असताना पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांवर झडप घालून चौघांना जेरबंद केले.
या आरोपींकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आले असून तिघे अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी दिली.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी विहित गाव बागुल नगर परिसरात गस्त घालत असताना सहा ते सात इसम पोलिसांना पाहताच झाडाझुडपात पळाले. ही माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी वरिष्ठांना कळवली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पंडित अहिरे, अविनाश देवरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रांगडे, विशाल कुवर, समाधान वाजे व अजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अंधारात झाडाझुडपात शोध मोहिम राबवून सराईत गुन्हेगार तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान (रा. राजवाडा, देवळाली गाव), रहमान जाफर शेख, समीर जाकीर शेख (रा. विजय नगर, जय भवानी रोड) आणि गौरव आनंद बाविस्कर (रा. देवळाली गाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन धारदार हत्यारे तसेच दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेत तीन संशयित रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगमार्गे पसार झाले.
चौकशीत या संशयितांनी मार्गावरील वाहनांची लूट करण्याच्या उद्देशाने जमल्याचे कबूल केले आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गणेशोत पथकाच्या सतर्क गस्तीमुळे मोठा दरोडा टळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कार्यवाहीबद्दल पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलिसांचे कौतुक केले आहे.