नाशिक :- शरणपूर रोड वरील जैन मंदिरामधील मुर्ती, दानपेट्या चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री १० ते दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान शरणपूर रोडवरील सुमती सोसायटी येथील कुंथूनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातुच्या मुर्ती तसेच पुजेची भांडी व दोन दान पेट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी मनिष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा अतिसंवेदनशिल व धार्मिक भावानांशी निगडीत असल्याने या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत होते. त्यावेळी गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड व अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, मंदिरातून चोरलेले भांडे एका गोणीमध्ये घेवून दोन इसम हे शाईन मोटार सायकलवरून चांदशी गावाकडून आसामराम बापू पुलावरून नाशिककडे येणार आहेत.
ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोउनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोहवा प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, पोअं अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे यांचे पथक तयार केले.
या पथकाने आसाराम बापू पुलाजवळ, सापळा लावुन विशाल बाळू सांगळे (वय २३, रा. राहूलनगर, वेदमंदीरच्या मागे, त्रंबकेश्वर रोड, नाशिक), शिवा गोपाळ डोंगरे (वय २३, रा. कामगार नगर, सातपूर, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार लकी विल्सन भंडारे (वय १९, रा. ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपुररोड, नाशिक) यांनी सुमती सोसायटी येथे जैनमंदिरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडुन चोरीस गेलेला एकुण १,५०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली ८०,००० रूपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण २,३०,००० रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्यानंतर तिन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी यापुर्वी स्वामी डेव्हलपर्स ऑफीस, जेहान सर्कल गंगापुररोड, नाशिक येथुन रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातुन ६४,००० रूपये हस्तगत करण्यात आले.
त्यांच्या ताब्यात मिळुन आलेले चांदी भांडे व मोबाईल फोन असे एकुण ६४,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता गंगापुर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे दिसुन आल्याने हा गुन्हा उघडकीस आला आहे. वरील आरोपींकडून ३,५८,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे.