नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : इन्कम टॅक्स विभागाने रेड टाकल्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत तिघांची मिळून 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर संपतराव तिडके (वय 47, रा. मु. परमोरी, पो. अवनखेड, ता. दिंडोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी कुणाल गणेशभाई डेकाटे (वय 32, रा. ऋषिराज बिल्डिंग, गंगापूर रोड) व सौ. रविना डेकाटे यांनी तिडके यांच्या कुटुंबासोबत जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने त्याच्याकडे इन्कम टॅक्स विभागाची रेड पडली असल्याचे सांगत काही कालावधीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे तिडके कुटुंबीयांना सांगितले.
हे ही वाचा !
तिडके कुटुंबीयांना याबाबत सहानुभूती वाटली. फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत त्याने या सहानुभूतीचा फायदा घेत तिडके कुटुंबीयांकडून 65 लाख 39 हजार 140 रुपये घेतले. त्यानंतर त्याने केवळ 1 लाख 30 हजार रुपये तिडके यांना परत केले. उर्वरित 64 लाख 9 हजार 140 रुपये मात्र देणे बाकीच ठेवले. अशाच प्रकारे डेकाटे याने आणखी दोन जणांना आर्थिक अडचण सांगून त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्याकडूनही पैसे उकळले.
अशा प्रकारे डेकाटे याने तिघांची मिळून एकूण 2 कोटी 16 लाख 37 हजार 140 रुपयांची फसवणूक केली. तिघांना पैसे परत न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिघांपैकी ज्ञानेश्वर तिडके याने कुणाल डेकाटे व रविना डेकाटे यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल डेकाटे याला अटक केली असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे करीत आहेत.