नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात, तसेच सध्याच्या प्रलंबित कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यास 2 लाख 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी सावरपाडा (ता. दिंडोरी) येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवारपाडा येथे यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीसस्वरूपात, तसेच सध्याच्या प्रलंबित असलेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश नारायण घारे (वय 44, रा. तिरुमाला भूमिका, काठे गल्ली, द्वारका, नाशिक) व दिंडोरी पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव (वय 29, रा. कुंजविहार सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यांनी तक्रारदारांकडे 2 लाख 16 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
ही रक्कम दि. 8 ऑगस्ट रोजी दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात स्वीकारताना योगेश घारे व मनीष जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या दोघांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.