नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : आयुक्त मॅडम, नाशिकचे रस्ते खड्डेमुक्त कधी होणार, आयुक्त मॅडम, पाणी द्या, नाशिकचे खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, अशा विविध घोषणांनी महापालिका परिसर सोमवारी सकाळी दणाणून गेला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या वेळी मनसेच्या वतीने मनपा आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे, वेगवेगळ्या भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मनसेच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. भगवे झेंडे व महापालिकेच्या निषेधाचे फलक हातात घेऊन महिला व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचे भाषण झाले.
हे ही वाचा...
शहरातील विविध भागांत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर काही भागांत पाणी येत नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. यावेळी विविध नेत्यांची भाषणे झाली. आंदोलनात रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकुश पवार, रवींद्र धिवरे, मनोज घोडके, धीरज भोसले, अर्चना जाधव, बंटी कोरडे, योगेश दाभाडे, मिलिंद कांबळे, सचिन सिन्हा, दत्ता पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.