नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : गुंतवणूक केलेली रक्कम दोन आठवड्यांत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची पाच जणांनी मिळून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की विकी शिंदे (वय 31, रा. मालेगाव), संदीप मत्साळकर (रा. इंदिरानगर), विष्णू मुरलीधर पाटील (वय 50, रा. मालेगाव कॅम्प, मालेगाव), प्रमोद बाबूलाल बिल्लाडे ऊर्फ क्षत्रिय (वय 41, रा. राजसारथी सोसायटीमागे, इंदिरानगर), चेतन संजय महाजन (रा. मु. पो. लोहोणेर, ता. देवळा) यांनी संगनमत करून ओपन हॅण्ड्स नावाची वेबसाईट निर्माण केली.
हे ही वाचा...
यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी घेतलेली नव्हती. त्यांनी गुंतवणूकदारांची झूम अॅपद्वारे व काही शहरांमध्ये मीटिंग घेत 12 ते 15 दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले.दहा हजार नागरिकांना गुंतवणुकीसाठी एक हजार रुपयांच्या पिनची विक्री करून 25 हजार व्यवहारांतून सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम त्यांनी स्वत:कडे घेऊन नागरिकांची फसवणूक केली.
हा सर्व प्रकार 25 मे ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला. गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम न मिळता मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वरील पाचही जणाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विष्णू पाटील, प्रमोद बिल्लाडे व चेतन महाजन यांना अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.