बळी मंदिराजवळ आयशरच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यु
बळी मंदिराजवळ आयशरच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यु
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव आयशरने पाठीमागून धडक दिल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची  ह्रदयद्रावक घटना आज दुपारी बळी मंदिर चौकात घडली.

राधाबाई रामभाऊ गायकवाड (वय ७०, रा. हनुमाननगर, अमृतधाम) असे अपघातात मयत झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
राधाबाई या घरातून आपल्या मुलीसमवेत एका धार्मिक कार्यक्रमासाठी पायी जात होत्या.

त्या पायी महामार्ग ओलांंडत असतांना एमएच ०४ एलक्यू ९७१३ या क्रमांकाच्या आयशर गाडी चालकाने धुळ्याकडून मुंबईकडे जातांना राधाबाई यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्यास आणि पायास जबर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

घटनेनंतर पोलीस दाखल झाले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून पोलिसांनी गाडी जमा केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group