नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : जुने नाशिक येथील चौक मंडई भागातील वझरे कॉम्प्लेक्सच्या मागील भागात एक जुना दुमजली वाडा काल दुपारी कोसळला. वाडा रिकामा होता, म्हणून जिवीतहानी झाली नाही, मात्र मातीखीली सापडून दोन रिक्शांसह चार दुचाकींचे नुकसान झाले.
जुन्या नाशकतील घर क्रमांक ३१४३ हा दुमजली वाडा दिलीप जुन्नरे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.हा वाडा कोसळल्याने एमएच १५ इएच १८६६ या रिक्शासह एक खाजगी रिक्शा व चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या धोकादायक वाड्याला नाशिक महापालिकेने धोकादायक असल्याची नोटीस देखील दिलेली होती, तरी त्यांनी धोकादायक भाग न काढल्याने काल ही घटना घडली.
नाशिक महानगर पालिकेच्या आपत्कालीन पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही सुरू केली. वाड्याचा इतर भाग सुरक्षित काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी इतर धोकादायक घरांना महापालिकेने त्वरीत काढून घेण्याची मागणी केली आहे.
जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक घरे आहेत. महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी अशा इमारतींना नोटिसा देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते. संबंधितांनी स्वतःहून अशा धोकादायक भागांची दुरुस्ती अथवा ते हटवणे गरजेचे आहे. मात्र घर मालकांकडून मनपाच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा घटना घडत आहे.
जुन्नरे वाडा हा मागील अनेक महिन्यांपासून बंद होता. मात्र तो गल्लीच्या मध्यभागी असल्याने तेथे लहान मुले खेळत असतात तर महिला वर्ग देखील जमा होतात. मंगळवारी दुपारी या वाड्याच्या भिंतीमधून माती पडायला सुरूवात झाल्याचे परिसरातील तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी तेथे खेळणाऱ्या लहान मुलांना बाजुला जायला सांगितले व काही वेळातच वाडा कोसळला. वेळीत लक्ष दिल्याने मोठे अनर्थ टळले.
सदर वाडा मागील अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत होता. नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाकडून यासंबंधी धोकादायक असल्याची नोटीसही संबंधित घरमालकास दिली होती.
- राजाराम जाधव, पूर्व विभाग अधिकारी, मनपा.