नाशिक (प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधब्या जवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर आयशर ट्रक व स्कुटी यांच्यात झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तिघांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात डॉक्टरानी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधब्याजवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर आयशर गाडी क्रमांक (MH 41 U 8525) व स्कुटी क्रमांक (MH 41 BQ 1723) यांच्यात जोरदार धडक होऊन दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मृत झालेले दोघेही बंधू राहुल बाळू खोडके (वय 25) आणि रोहित बाळू खोडके हे मूळचे गर्दनी, तालुका अकोला येथील रहिवासी असून, मागील एक वर्षापासून कासारी येथे वास्तव्यास होते. या अपघातात समाधान गोरख मेगाळ हा युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने नांदगावच्या ग्रामिण रुग्णालयात नेले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल साळुंखे यांनी तपासणी करून दोन्ही भावांना मृत घोषित केले.
या घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहेत.