नाशिक :- 8 हजार रुपयांची लाच घेताना 2 वनपालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
दिलीप भाईदास पाटील (वय 52, व्यवसाय वनपाल, मोडाळा, ता. पारोळा रा. देवपूर धुळे) व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय 38, व्यवसाय वनपाल, चोरवड , ता. पारोळा, रा.पारोळा जि. जळगांव) दोन्ही नेमणूक वनपरिक्षेत्र कार्यालय पारोळा अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता.
त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आरोपी दिलीप पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याप्रमाणे दिनांक 19/06/ 25 रोजी पडताळणी केली असता पाटील याने 8000 ची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज दि. 2 रोजी सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार यांच्याकडून पाटील यांच्या सांगण्यावरून आरोपी वैशाली गायकवाड ल यांना 8000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि. 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.