नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- बनावट दस्तऐवज तयार करून अन्य संचालकांची फसवणूक करून सुमारे २८ कोटी रुपयांची खंडणी मागणार्या श्रीलंकेतील दोघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी चिराग विलास पाटील (रा. अभियंतानगर, कामटवाडा) हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की दि. १ एप्रिल २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत ईव्हा ग्रीन प्लॅनेट प्रा. लि. नाशिकचे संचालक, ऐश्वर्या देव पेंदयेला (रा. हैदराबाद, तेलंगणा), नितेश त्रिपाठी (रा, इंदूर, मध्य प्रदेश) व इतर भागधारकांनी मिळून कंपनी स्थापन करतेवेळी आर्टिकल ऑफ असोसिएशन व मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनप्रमाणे उभारणीकामी ठरल्याप्रमाणे रक्कम भरली; परंतु कंपनीचे इतर संचालक आरोपी मथिवाथनी सेल्वासुंदरम्, अॅण्डी नवाज खान (दोघेही रा. सिनेमन लाईफजवळ, कोलंबो, श्रीलंका, कॅनडा) यांनी संगनमताने वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम न भरल्याने कंपनी सुरू होण्यास व्यत्यय आला.
याबाबत मथिवाथनी व अॅण्डी खान यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता वारंवार सांगितले असता त्यांनी रक्कम भरली नाही. दरम्यान, कंपनीच्या भागभांडवलाकरिता ४० कोटी रुपये जमा करण्याकरिता इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या संस्थेकडून कर्ज घेण्याचे ठरविले. या एजन्सीकडे भागभांडवलाकरिता २८ कोटी ४६ लाख कर्जाची मागणी केली असता संस्था दोन टप्प्यांमध्ये कर्जाची रक्कम देईल त्याकरिता प्रत्येक टप्प्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनीच्या संचालकांनी ६ कोटी ९ लाख रुपये दोन भागांमध्ये असे एकूण १२ कोटी १८ लाख रुपये जमा केले व असुरक्षित कर्जाद्वारे आर्थिक विश्वासार्हता दर्शविण्यासाठी सर्व संचालकांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक उत्पन्न, प्रमाणपत्र एजन्सीकडे सादर करतील, असे सांगितले.
त्याप्रमाणे ऐश्वर्या देव पेंदयेला यांनी भांडवल म्हणून १ कोटी ४५ लाख रुपये वैयक्तिक हमी म्हणून एजन्सीकडे दिले. आदित्य पेंदयेला यांनी १ कोटी १ लाख रुपये बहीण ऐश्वर्याच्या आई भानुदयेला यांनी भांडवल म्हणून १ कोटी १ लाख रुपये व व्यवसायाकरिता लोन म्हणून १ कोटी ४० लाख रुपये असे एकूण २ कोटी ४१ लाख रुपये कंपनीस व्यवसायासाठी दिले.
अन्य संचालक नितेश त्रिपाठी व फिर्यादी यांनी कंपनीस भांडवल म्हणून ५० लाख रुपये मित्रांकडे लोन म्हणून घेऊन दिले, तसेच ऐश्वर्या पेंदयेला यांचे चुलतभाऊ जयंत मंगलपल्ली यांनी ५० लाख रुपये असे दोन्ही मिळून १ कोटी रुपये कंपनीला भांडवल म्हणून दिले. त्यावेळी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मिळणार्या कर्जाकरिता २८ कोटी ४६ लाख रुपयांची हमी देण्याकरिता कंपनीच्या संचालकांना सांगण्यात आले.
त्याकरिता आरोपी मथिवाथनी सेल्यासुंदरम् व अॅण्डी नवाज खान यांनी फिर्यादीस व इतर संचालकांस प्रॉपर्टी वैयक्तिक हमीकरिता एजन्सीकडे गहाण ठेवण्यास सांगितले. त्यावरून फिर्यादी पाटील, संचालक ऐश्वर्या देव व नितेश त्रिपाठी यांनी संबंधित एजन्सीच्या लोन रकमेच्या वैयक्तिक हमीकरिता त्यांच्या प्रॉपर्टी संस्थेकडे गहाण ठेवल्या. फिर्यादी कंपनीकरिता प्रथम टप्प्यात कंपनीस १४ कोटी २३ लाखांचे कर्ज दिले आहे; परंतु कंपनीच्या सर्व संचालकांमध्ये ठरल्याप्रमाणे आरोपी मथिवाथनी सेल्वासुंदरम् व अॅण्डी नवाज यांनी त्यांच्या ६ कोटी ९ लाखांच्या मान्य दायित्वापैकी २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा केला.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी पाटील व इतर संचालकांकडे अवाजवी रक्कम मागण्यास सुरुवात केली. त्यावर अद्याप कंपनी सुरू झाली नाही, म्हणून पैसे देता येणार नाहीत, असे सांगितले. आरोपींनी कंपनी सुरू होऊ देणार नाही, तुमचे आर्थिक नुकसान करू, अशी धमकी देऊन १६ कोटी रुपयांची खंडणीच्या स्वरूपात मागणी केली. त्यावर फिर्यादी पाटील व संचालकांनी नकार दिला. कंपनी सुरू होण्यास विलंब होत असल्याने कंपनीच्या इतर संचालकांनी सौ. मथिवाथनी व अॅण्डी नवाज खान यांना उर्वरित पैसे कंपनीच्या खात्यावर भरण्याकरिता सांगितले असता त्यांनी दि. २९ मे २०२५ रोजी पुन्हा इव्हा ग्रीन कंपनीच्या अधिकृत मेल आयडीवर कंपनीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने भीती दाखवून कंपनीतून बाहेर पडण्यासाठी १२ कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच कर्जासाठी आरोपींनी दिलेली वैयक्तिक हमी रोखण्याची धमकी ई-मेलद्वारे दिली.
यावरून फिर्यादी यांची खात्री झाली, की आरोपी मथिवाथनी सेल्वासुंदरम् व अॅण्डी नवाज खान यांनी संगनमत करून फिर्यादीच्या स्वाक्षरीचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीचे नुकसान करण्याची भीती दाखवून २८ कोटींची रक्कम खंडणीस्वरूपात फिर्यादीसह कंपनी व इतर संचालकांचा विश्वासघात केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पलांडे करीत आहेत.