एका वृद्ध महिलेच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे बनवून डेव्हलपमेंट करार केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व येथील तिसगाव परिसरातून उघडकीस आली आहे. या प्रकरणात कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये राम दिनकर म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, राम म्हात्रे यांच्या आई राजूबाई दिनकर म्हात्रे यांच्या नावावर तिसगाव येथे एक जमीन आहे. या जमिनीबाबत संदीप गायकवाड या व्यक्तीने राजूबाई म्हात्रे आणि इतर सहा जणांच्या नावाने डेव्हलपमेंट करार केला. पण हा करार करताना राजूबाई यांना न बोलावता त्यांच्या नावासमोर दुसऱ्या महिलेचा फोटो लावून आणि हाताचा ठसा घेऊन बनावट करारनामा तयार करण्यात आला.
डेव्हलपमेंट करारामध्ये राजू गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीने साक्षीदार बनून बनावट महिलेला आम्ही ओळखतो, अशी खोटी साक्ष दिली, असा आरोप राजूबाई यांचा मुलगा राम म्हात्रे यांनी केला आहे. खोटी कागदपत्रेच नव्हे, तर खोटे साक्षीदार उभे करुन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फसवणूक प्रकरणानंतर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, तपासाचा वेग संथ गंतीने होत असल्याचा आरोप राम म्हात्रे यांनी केला आहे.
गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेतले नाही किंवा प्राथमिक चौकशीही केली नाही. बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यक्तींच्या सहाय्याने जमिनी हडपल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार म्हात्रे यांनी केली आहे.