जळगाव जिल्ह्याच्या सुमठाणे शिवारात एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे , ज्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. येथे एका विकृत माथेफिरूने दीड महिन्यात दोन महिलांचा निर्घृण खून केला आहे. महाराष्ट्रात सीरियल किलरचा प्रकार समोर आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. या नराधमाने दीड महिन्यात दोन महिलांची हत्या केली इतकंच नव्हे तर आणखी एका महिलेला जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत होता. या महिलेची देखील हत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे.
जळगावच्या अमळनेर येथील सुमठाणे व जानवे शिवारात दोन महिनांचे खून करुन तिसऱ्या महिलेच्या खुनाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल गोविंद संदानशिव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे, अमळनेर तालुक्यातील सुमठाणे येथील रहिवासी आहे.
महिलांकडे असलेले पैसे तसेच दागिने मिळवण्यासाठी तो महिलांचे खून करायचा अशी माहिती तपासात समोर आले आहे. अटकेतील आरोपीने दोन्ही खुनाची, तसेच एक खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेची कबुली दिली आहे
शोभाबाई रघुनाथ कोळी, वैजंताबाई भोई असे खून झालेल्या दोन मयत महिलांची नावे असून शहनाज बी या महिलेच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तो महिलांशी गोड बोलायचा, त्यानंतर ओळख निर्माण करुन तो त्यांचा विश्वास मिळवायचा. त्यानंतर त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवून त्यांचा खून करुन मृतदेह जंगलात फेकून द्यायचा. त्याची हत्या करण्याची स्टाइलदेखील एकच असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासात तसेच इतर ठिकाणी तो महिलांशी ओळख निर्माण करायचा. त्यानंतर सूमठाणे येथे महिलांच्या डोक्यात दगड टाकून तो खून करायचा. तिसरी महिला शाहनाज बी हिलादेखील अशाच प्रकारे ठार करण्याचा त्याचा प्लान होता. मात्र सुदैवाने तिला वेळीच त्याचा संशय आल्याने ती बचावली.
महिलांकडील दागिने आणि पैसे मिळवण्यासाठी तो खून करायचा अशी कबुली त्याने दिली आहे. अमळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या या घटनेचा उलगडा करण्याची कामगिरी केली आहे. दरम्यान, सुरुवातीला दुहेरी हत्याकांडाने जळगावात एकच खळबळ उडाली होती.
25 जून रोजी आरोपीने पहिला खून केला होता. शोभाबाई कोळी यांचा मृतदेह जंगलात आढळून आला होता. तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. तर, गोणीत मृतदेह ठेवून फेकण्यात आला होता. त्यानंतर 23 जुले रोजी त्याने वैजंताबाई भोईं यांचा खून केला. त्याच जंगलात आणि तशीच पद्धत वापरून त्याने वैजंताबाई यांना संपवले होते.