नाशिक :- पंचवटीतील फुलेनगर परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटात दगडफेक व बाटलीफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली.
यावेळी एकाने गोळीबार केल्याने नागरिक घाबरले. ही घटना आज पहाटे दीड ते दोन वाजेदरम्यान घडली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज पहाटे फुलेनगर येथील मुंजोबा चौकात राहणारे सुमित महाले (वय 21) व त्यांचा गट तसेच त्याच परिसरात राहणारे विकास विनोद वाघ, ऋषिकेश गणेश परसे, जय संतोष खरात, जय मोरे, तुंड्या दादू व त्यांचा गट अशा २ गटात हाणामारी झाली. मागील भांडणाची कुरापतीवरून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक केली. त्यापैकी एकाने गोळीबारही केला.
या गोळीबार प्रकरणात सर्व सराईत गुन्हेगार असून, प्रत्येकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. तर गुन्ह्यातील दोघे हद्दपार असून, त्यांनी शहरात वावरत असताना गुन्हा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस त्वरित दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.