Nashik : विडी कामगारनगरमध्ये तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू; नागरिकांचा रास्ता रोको
Nashik : विडी कामगारनगरमध्ये तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू; नागरिकांचा रास्ता रोको
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- पंचवटीतील विडी कामगारनगरमध्ये एका खासगी बिल्डरने खोदलेल्या खड्ड्यात निर्माण झालेल्या तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनदेखील केले.

पंचवटीतील विडी कामगारनगर येथून काल सकाळी साडेअकरा वाजेपासून बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लागत नव्हता. ही सर्व वस्ती कामगारनगरी असून, या ठिकाणी राहणारे साई गरड, साई उगले आणि साई मोहिते अशी या तिन्ही मुलांची नावे असून, ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा काल दिवसभर शोध घेण्यात आला; परंतु ते सापडले नाहीत. त्यामुळे या सर्व परिसरामध्ये चिंतेचे वातावरण होते. 

आज सकाळी या परिसरात नागरिक शोध घेत असताना या ठिकाणी असलेल्या पाटालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्या ठिकाणी संबंधित बिल्डरने मोठा खड्डा खोदून तळे तयार केले होते. या तळ्यामध्ये या तिन्ही मुलांच्या चपला व कपडे आढळून आले. त्यानंतर ही मुले बुडून मरण पावली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. तातडीने या भागातील नागरिकांनी आडगाव पोलीस व अग्निशमन दलाला या ठिकाणी बोलावले.

त्यानंतर एक तासाच्या शोध मोहिमेनंतर या तलावात साई गरड, साई उगले आणि साई मोहिते या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने एअरपोर्टच्या सहाय्याने शोध सुरू केल्यानंतरसुद्धा मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या; पण त्याही परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधून काढले आहेत.

याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनवणे व नागरिकांनी मोठी गर्दी केली. संबंधित बिल्डरवर कारवाई करावी आणि इतर मागण्यांसाठी नागरिकांनी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिले असून, महापालिकेच्या अधिकार्‍यानेदेखील योग्य ती कारवाई करू, असे सांगितल्यानंतर एक तासानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनामुळे नाशिक-मालेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group