राजकीय चित्र बदलणार ! ना भाजप ना ठाकरे,  महादेव जानकरांनी निवडला नवा मित्र
राजकीय चित्र बदलणार ! ना भाजप ना ठाकरे, महादेव जानकरांनी निवडला नवा मित्र
img
वैष्णवी सांगळे
सध्या महानगपालिका निवडणूकांच्या रणधुमाळीत पक्षांतरांना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर कुठे महायुतीत तर कुठे महाविकास आघाडीत मतभेद होत आहेत तर कुठे विरोधातील पक्ष एकत्र येत आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि एकेकाळी भाजपच्या सोबत असणाऱ्या महादेव जानकर यांनी नवा सखा निवडला आहे. 

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका रासप हा काँग्रेससोबत लढणार असल्याची घोषणा जानकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपसोबत महायुतीत असलेल्या महादेव जानकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस सोबत आघाडीचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वीच महादेव जानकर हे ठाकरेंनी मराठी निमित्ताने आयोजित केलेल्या जल्लोष मेळाव्यात दिसून आले होते. त्यानंतर जानकर महाविकास आघाडीसोबत येतील, असे बोलले जात होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत या आघाडीची घोषणा केली. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे यावेळी जाहीर केले. 

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे’.महादेव जानकर म्हणाले की, ‘काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आज घडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे’.


इतर बातम्या
Join Whatsapp Group