8 वर्षांनंतर महापालिका निवडणूक; नाशिक रोड प्रभागात
8 वर्षांनंतर महापालिका निवडणूक; नाशिक रोड प्रभागात "भावी नगरसेवकांची" उमेदवारी अर्जासाठी प्रचंड गर्दी...
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- गेल्या तब्बल आठ वर्षांनंतर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत असल्याने संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, नाशिकरोड विभागात उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी सहा प्रभागांसाठी तब्बल २६६ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. दुर्गा उद्यानाजवळील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून अर्ज विक्रीस सुरुवात झाली. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार अर्ज खरेदीसाठी मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल झाले होते.

अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना (ठाकरे गट व शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी यांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज खरेदी केले. काही इच्छुकांनी चार ते पाच अर्ज एकाच वेळी खरेदी केल्याचेही निदर्शनास आले.

नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १७, १८, १९, २०, २१ आणि २२ या सहा प्रभागांसाठी अर्ज विक्री करण्यात आली. मात्र अर्ज विक्रीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने रांगेत उभ्या असलेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी नाईक यांच्याकडे तक्रार नोंदवली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असून आज अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे.

गेल्या आठ वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असून, अनुभवी तसेच नवोदित इच्छुकांमध्ये नगरसेवक होण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रभागनिहाय अर्ज विक्री
प्रभाग १७ – ५३ अर्ज
प्रभाग १८ – ४९ अर्ज
प्रभाग १९ – ४१ अर्ज
प्रभाग २० – ४९ अर्ज
प्रभाग २१ – ४९ अर्ज
प्रभाग २२ – २६ अर्ज
इतर बातम्या
Join Whatsapp Group