नाशिक - नाशिकमध्ये महायुती करण्यासाठी भाजप तयार होतं परंतु मित्र पक्षांची मागणी ही जास्त असल्यामुळे ती पूर्ण करणे पक्षाला शक्य नव्हतं. युती होऊ शकली नाही याची खंत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेला गोंधळ आणि तिकीट वाटप या सर्व विषयावरती पत्रकारांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासूनच मित्र पक्षांबरोबर युती करण्यास तयार होता , परंतु मित्र पक्षांनी ज्या जागांची मागणी केली होती ती जास्त होती , त्यांना त्याबाबत कमी जास्त करण्यास सांगितले होते. परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही त्यामुळे बोलणी पुढे होऊ शकली नाही. बोलणी करावी यासाठी भाजप तयार होतं पण वेळ मिळत नसल्याकारणाने ही बोलणी होऊ शकली नाही. भाजपाची मित्र पक्षांबरोबर युती होऊ शकली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नाशिक मध्ये एक तास जो महामार्गावरती सगळा गोंधळ झाला त्या सगळ्या प्रकरणाबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्या पद्धतीप्रमाणे भाजपाची संस्कृती आहे ती धुळीस मिळवणाऱ्या आणि या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची पक्ष पातळीवरती चौकशी केली जाईल. त्या चौकशीचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना दिला जाईल. त्यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही. झालेला प्रकार हा चुकीचा आहे पक्ष शिस्तीप्रमाणे एबी फॉर्म चे वाटप करू देणे अपेक्षित होते असेही ते म्हणाले.