नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - घरी सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणीला गुंगीकारक शीतपेय पाजून तिच्यावर निर्जनस्थळी लैंगिक बलात्कार करणार्या तरुणासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही अशोका मार्ग सिग्नलजवळ उभी होती. त्यावेळी उमेश नावाचा आरोपी तरुण तेथे आला. त्याने “दीदी, चल, तुला घरी सोडतो,” असे सांगून त्याचा मित्र रॉकी चालवीत असलेल्या एमएच 15 जीपी 2767 या क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडवर पीडितेला बळजबरीने बसविले.
त्यानंतर आरोपी उमेश याने त्याच्या हातातील गुंगीकारक शीतपेय पीडितेला पिण्यास दिले. ते शीतपेय प्याल्यानंतर पीडितेला नशा झाली. त्या नशेमध्ये आरोपी उमेश याने पीडितेला तपोवन येथे निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व या कामात त्याचा मित्र रॉकी याने उमेशला मदत केली. ही पीडिता सकाळी शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार झाल्याची बाब तिच्या लक्षात आली.
हा प्रकार दि. 10 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा ते दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान तपोवनातील निर्जनस्थळी घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उमेश व रॉकी (दोघांचीही पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.