बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक मोठे परिवार आहेत, परंतु ‘खन्ना’ परिवाराबद्दल तितकंसं काही कोणाला माहित नाही. विनोद खन्ना यांच्यानंतर त्यांच्या ४ मुलांपैकी दोघे मनोरंजन क्षेत्राकडे वळले , मात्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी काही दोघांनाही मिळाली नाही. त्यामुळे अक्षय खन्ना आणि त्यांच्या कुटुंबियाबाबत जास्त कोणाला माहिती नाही.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय खऱ्या आयुष्यात मात्र फार लोकांमध्ये मिसळत नाही. बॉलिवूडच्या कोणत्याच पार्ट्यांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुद्धा तो दिसत नाही. दमदार अभिनयाच्या तुलनेत तितकी प्रसिद्धी अक्षय खन्नाकडे नाही.
अक्षय खन्नाच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर अक्षय खन्नाच्या आजोबांचं नाव किशनचंद्र खन्ना तर आजीचं नाव कमला खन्ना. किशनचंद खन्ना हे कपड्यांचा व्यवसाय करणारे प्रसिद्ध व्यापारी. तर कमला या गृहिणी होत्या. या दोघांना दोन मुलं आणि तीन मुली होत्या. अक्षय खन्नाच्या वडिलांचं नाव विनोद खन्ना आहे. विनोद खन्ना यांच्या कुटुंबात त्यांच्या आईवडिलांशिवाय तीन बहिणी आणि एक भाऊ प्रमोद खन्ना होते.
अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना हे 70 आणि 80 च्या दशकात सुपरस्टार होते. ते अमिताभ बच्चन यांनासुद्धा टक्कर द्यायचे. परंतु आयष्यातील काही निर्णयांमुळे त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी सर्व सोडून अध्यात्माचा स्वीकार केला होता. 1982 मध्ये ते संन्यासी बनले आणि अमेरिकेला निघून गेले. त्यावेळी अक्षय फक्त ५ वर्षांचा होता. विनोद खन्ना यांच्या या निर्णयाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. अखेर १९८५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
विनोद खन्ना यांनी पहिलं लग्न गीतांजली तालेयारखानशी केलं होतं. गीतांजली यांचं कुटुंब पारसी होतं. त्या एक प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटरच्या कन्या होत्या. दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या काळात विनोद खन्ना आणि गीतांजली यांचं नातं फारच मॉडर्न मानलं जात होतं. या दोघांना अक्षय आणि राहुल ही दोन मुलं आहेत. अक्षयसारखाच राहुलसुद्धा अभिनेता आहे. 2017 मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं. त्यानंतर एका वर्षाने 2018 मध्ये गीतांजली यांचंही निधन झालं.
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर विनोद खन्ना यांच्या आयुष्यात कविता दफ्तरीची एण्ट्री झाली. 1990 मध्ये विनोद खन्ना यांनी तिच्याशी दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर त्यांच्या करिअरच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली आणि ते राजकीय क्षेत्रातही यशस्वी होते. विनोद खन्ना आणि कविता यांना दोन मुलं आहेत. अक्षय खन्नाच्या सावत्र भावाचं नाव साक्षी खन्ना तर बहिणीचं नाव श्रद्धा खन्ना आहे. या दोन्ही कुटुंबात चांगले संबंध आहेत.