प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते.
त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जयपूर येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत. नाशिकचा डावखुरा फिरकीपटू-अष्टपैलू सत्यजित बच्छाव व जलदगती गोलंदाज-अष्टपैलू रामकृष्ण घोष या दोघांची यंदा देखील महाराष्ट्र संघातर्फे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मार्च २०१७ पासून सत्यजित महाराष्ट्र संघातर्फे खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या ४८ सामन्यांत सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे ८१ बळी घेतले आहेत. रणजी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजितने २०१२ पासूनच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भेदक गोलंदाजी बरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजित वेळेवेळी आपला वाटा उचलत असतो.
रामकृष्ण देखील गेल्या दोन हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. सत्यजित प्रमाणेच रणजी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात २०२२ पासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
जलदगती गोलंदाज व फलंदाज अशी ओळख असलेला रामकृष्ण घोष मागील हंगामापासून विविध स्पर्धांत आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवत आहे. मागील वर्षापासून आय पी एल साठी महेंद्र सिंग धोनी व ऋतुराज गायकवाडच्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स - सी एस के - तर्फे निवड झाली आहे.
सत्यजित व रामकृष्णच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजित व रामकृष्णचे अभिनंदन करून विजय हजारे स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचे साखळी सामने पुढीलप्रमाणे - २४ डिसेंबर - पंजाब , २६ डिसेंबर - सिक्कीम , २९ डिसेंबर - हिमाचल प्रदेश , ३१ डिसेंबर - उत्तराखंड , ३ जानेवारी - मुंबई , ६ जानेवारी - छत्तीसगड व ८ जानेवारी- गोवा.