नाशिक - तपोवनामध्ये होत असलेल्या माईस हबचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने ऑनलाईन घोषित केलेली आहे. यामुळे मागील 21 दिवसापासून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षाला काहीसे यश आले असले तरी अजून पर्यंत ही योजना रद्द करण्यात आलेली नाही.
नाशिकमधील तपोवन येथे झाडांची छाटणी करून त्या ठिकाणी माईस हब उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार होती. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून माईस हबची निर्मिती केली जाणार होती.
परंतु या ठिकाणी असलेल्या झाडांची कत्तल करू नये यासाठी मागील 21 दिवसापासून अधिक काळ पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केले. त्यामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, विविध सिने - नाट्य कलावंत तसेच जिल्ह्याच्या बाहेरील संघटना देखील सहभागी झाल्या आणि या आंदोलनाला मोठी धार चढली होती.
या सर्व प्रश्नांचा विरोध डावलून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये 15000 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा कार्याच्या शुभारंभ केला. यावेळी विविध साधू, महंत देखील उपस्थित होते.
वृक्ष तोडीला विरोध असताना राज्य शासनाच्या वेबसाईट वर नाशिक शहरातील तपोवन या ठिकाणी सुरू असलेल्या माईस हबच्या कामाचा ठेका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. पण निश्चित कोणत्या कारणाने ठेका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले नाही.