नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दि नाशिक रोड व्यापारी सहकारी बँकेचे सहा संचालक थेट नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय व सहकारी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बँकेचे तीन संचालक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे.
सुमारे ८० हजाराच्या जवळपास सभासद आणि ८०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेली ही बँक उत्तर महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बँकेचे प्रमुख नेते दत्ता गायकवाड हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते असून, निवृत्ती अरिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हा नेते तसेच महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या कोअर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे सहकार आणि राजकारण यांचा अनोखा संगम या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत बँकेच्या संचालिका रंजना बोराडे, जनसंपर्क संचालक नितीन खोले तसेच रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, गणेश खर्जुल आणि वसंत अरिंगळे हे संचालक प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक २१ मध्ये नितीन खोले, रमेश धोंगडे आणि सुधाकर जाधव हे तिघेही संचालक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने हा प्रभाग चुरशीचा ठरला आहे.
याशिवाय बँकेच्या ज्येष्ठ संचालिका कमल आढाव यांचे पती दिनकर आढाव हे प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवत असून, संचालक रामदास सदाफुले यांची कन्या प्रभाग क्रमांक २१ मधून, मनोहर कोरडे यांची सून आणि श्रीराम गायकवाड यांची पत्नी आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे एका बाजूला थेट संचालक तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग दिसून येत आहे.
सहकार क्षेत्रात एकत्र काम करणारे संचालक आता थेट महानगरपालिकेच्या राजकारणात उतरत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या १६ जानेवारीला या बँकेचे किती संचालक नगरसेवकपदाची माळ गळ्यात घालून पुन्हा व्यापारी बँकेच्या दालनात प्रवेश करतील, याची उत्सुकता बँकेचे सभासद, अधिकारी-कर्मचारी तसेच नाशिकवासीयांना लागून राहिली आहे