मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या १४ चाकी मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सीजी ०७ सीके ९७८४ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर वायरिंगचे बंडल भरलेले होते. ही घटना पाथर्डी शिवारात, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (CNG) पंपासमोर घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी व सिडको अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. दरम्यान, ट्रकमध्ये भरलेली वायरिंगची बंडले दोन जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे ट्रक व मालाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.