नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित 17 वर्षीय युवती हिची ओळख तिच्या मैत्रिणीचा मित्र आकाश कांगुणे याच्यासमवेत झाली होती. दि. 10 मे ते ऑगस्ट 2025 या चार महिन्यांच्या कालावधीत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
“तू मला आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे,” असे सांगत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. बिटको पॉईंट येथील डॉमिनोज् पिझ्झाजवळ एका लॉजवर वेळोवेळी घेऊन जात त्याने पीडितेवर अत्याचार केले. दरम्यानच्या काळात तिला दम्याचा व खोकल्याचा त्रास होत असल्याने तिच्या आईने तपासणीसाठी तिला बिटको रुग्णालयात नेले.
तपासणीदरम्यान यूपीटी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ती गरोदर असल्याचे समोर आले. अखेर तिने आकाश कांगुणेविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कांगुणे सध्या फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.