वणीत ८-१० जणांच्या टोळक्याकडून मंदिर परिसरात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न
वणीत ८-१० जणांच्या टोळक्याकडून मंदिर परिसरात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न
img
दैनिक भ्रमर
वणी – वणी शहरात धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्रे हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

भाविकांची वर्दळ असलेल्या या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.

दि. ८ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० ते १०.५० वाजेच्या दरम्यान साधारण आठ ते दहा युवकांनी दारू आणि गांजाच्या नशेत देवी मंदिराच्या आवारात घुसून शिवीगाळ, आरडाओरडा करत तलवारीसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात उच्छाद माजवला. मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असतानाच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

या संदर्भात धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टने पोलिसांकडे राजेंद्र थोरात, रोशन पवार, अमोल देशमुख, पोपट काका थोरात, राकेश थोरात यांच्या सहीचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

याच दरम्यान राजेंद्र मढवई यांनाही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले असून प्रभावित व्यक्तींनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदवली. दोन तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात तुषार केशव गवे (वय २१, रा. वणी) हा युवक या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

नशेच्या अवस्थेत हातात धारदार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरवणे या गंभीर कृत्यांबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरवण्याचा निर्णय घेतला.

पोलिस ठाण्यातून सुरुवात करून शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ व जगदंबा देवी मंदिर परिसर असा संपूर्ण मार्गक्रमण करत आरोपीला सार्वजनिकरीत्या फिरवण्यात आले. जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून येथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या धिंडीत वणीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पो. उपनिरीक्षक गणेश कुटे, पो. उपनिरीक्षक किरण जगदाळे व अन्य कर्मचारी सहभागी होते. पोलिसांच्या या कठोर पावलाचे नागरिकांनी स्वागत केले असून धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांवर तातडीने व कठोर कारवाई केली जात असल्याने शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group