नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हिरावाडी, पंचवटी येथील विवाहिता नेहा संतोष पवार हिचा सासरी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पती, सासू व तीन नणंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, की सुमारे सहा महिन्यांपूर्वी गेल्या जूनमध्ये नेहा व संतोष पवार यांचा विवाह झाला, तेव्हापासून वेळोवेळी माहेरून पैसे आणावेत म्हणून सासरी शारीरिक व मानसिक छळ होत होता, तसेच तिच्या चारित्र्यावरदेखील संशय घेतला जात होता.
या छळास कंटाळून तिने बुधवारी राहत्या घरी सेल्फॉस नावाची विषारी पावडर सेवन केली. हे लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.
दरम्यान, सासरी छळ होत असल्याबाबत नेहा पवार हिने आपल्या भावास व पोलिसांना सुसाईड नोट लिहून कळविले होते. तिचे निधन झाल्यामुळे पोलिसांनी नेहाच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्यांनी छळ केल्याबद्दल पती संतोष, सासू जिजाबाई व तीन नणंदांविरुद्ध गुन्हा नोंदवून पाचही जणांना अटक केली आहे.
पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नेहाचे निधन होताच नेहाला न्याय द्या म्हणून माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.