नाशिक - राज्य निवडणूक आयोगाने उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे मनमाड नगरपालिकेची प्रभाग 10 ची निवडणूक स्थगित केली आहे. मात्र या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.
राज्यामध्ये सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीची धामधूम चालू आहे. यामध्ये प्रचाराचे शेवटचे पाच दिवस राहिले आहे.
काल राज्यातील या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान धुळ्यातील पिंपळनेर या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मधील कुसुम पाथरे, नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील प्रभाग क्रमांक दहा मधील नितीन वाघमारे आणि बीड जिल्ह्यातील गेवराई प्रभाग क्रमांक 11 मधील दुरुदा बेगम फारुकी या तीन उमेदवारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिल्यानंतर आज सायंकाळी निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी एक आदेश काढून या तीनही ठिकाणी म्हणजे नगरसेवक पदासाठी होत असलेली ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याच्या कारणाने स्थगित केली आहे.
मात्र दुसरीकडे थेट नागरिकांमधूनच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा निवडून द्यावयाचा आहे म्हणून या प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचे मतदान होणार आहे, असे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.