नाशिक :- शहरात दहशत निर्माण करून तब्बल नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत खंडणीखोराच्या मुसक्या आवळण्यात अखेर अंबड गुन्हे शाखेला यश आले आहे.
राजस्थान, पुणे अशा विविध ठिकाणी आश्रय घेत पोलिसांना सतत चकवा देणाऱ्या विराज उर्फ राज जगदीश जंगम (वय ३०) याला गंगापूर रोड परिसरातील पाईप लाईन रोडवरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील सराफ बाजार परिसरात राहुल अशोक तिवारी हे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह राहतात. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी, म्हणजेच आरोपी विराज जंगम याने तिवारी यांना "या भागात राहायचे असेल, तर एक लाख रुपये हप्ता द्यावा लागेल," अशी धमकीवजा मागणी केली होती. तिवारी यांनी पैसे देण्यास नकार देताच, त्याने तिवारी यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याच रात्री तिवारी यांच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली.
यात त्यांच्या घराच्या खिडक्या आणि थार गाडीच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. "दोन दिवसांत एक लाख रुपये दिले नाही, तर तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंबड गुन्हे शाखेचे पथक विराजच्या मागावर होते. पो.अं. भगवान जाधव आणि चारूदत्त निकम यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, 'विराज जंगम हा पाईपलाईन रोड, गंगापूर परिसरात येणार आहे'. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ तेथे सापळा रचला. दुपारी च्या सुमारास विराज परिसरात येताच, साध्या वेशातील पोलिसांनी त्याला कोणतीही हालचाल करण्याची संधी न देता चारी बाजूंनी घेरले आणि शिताफीने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपूत, पोउनि. मोतीलाल पाटील, सपोउनि. सुहास क्षिरसागर यांच्यासह प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, भगवान जाधव, चारूदत्त निकम आणि सविता कदम यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.