नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- त्रिंबक नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना त्र्यंबकेश्वर येथील स्व:तच्या भूखंडावर नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे. यासाठी त्यांनी वास्तूविशारदामार्फत नगरपालिकेकडे ऑनलाईन कागदपत्रे सादर करून विहित शुल्काचे चलनही भरले होते. परंतु, बांधकामाची परवानगी प्राप्त झाली नाही.
त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले. तेव्हा त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील रचना सहायक (वर्ग दोन) मयूर शाम चौधरी याने स्वतःच्या भ्रमणध्वनीवर २५ हजार असे टाईप करून ही रक्कम सफाई कामगार अमोल दोंदे याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडीअंती १० हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित झाले होते.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता संशयित अमोल दोंदे याने २५ हजार रुपये, लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यास संशयित मयूर चौधरीने मान्यता दिली. यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, या प्रकरणी रचना सहाय्यक (वर्ग दोन) मयूर चौधरी आणि सफाई कामगार अमोल दोंदे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.