नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : पळसे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी (वय ५०) यांचा मृतदेह पळसे गावालगत असलेल्या नाल्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कैलास चौधरी हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य असून ते ११ डिसेंबरपासून बेपत्ता होते.
कैलास चौधरी हे ११ डिसेंबर रोजी पहाटे पळसे येथील आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने नातेवाईकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद केली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.
दरम्यान, आज पळसे गावातील राजवाडा परिसरालगत असलेल्या नाल्यात एका महिलेच्या निदर्शनास एका इसमाचा मृतदेह पडलेला आढळून आला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता सदर मृतदेह हा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
कैलास चौधरी यांनी सन २००७ मध्ये शिवसेना पक्षाकडून पळसे गटातून जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.