नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नेहमी दारू पिऊन आईवडिलांसह पत्नीला शिवीगाळ करणार्या मद्यपी मुलाला ओढणीने गळफास देऊन त्याचा खून केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पूजा विशाल पाटील (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की दि. 25 जून रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे पती विशाल पाटील यांनी त्यांना कामावर सोडले. त्यानंतर विशाल पाटील हा दारू पिऊन घरी आला होता व त्याने दारूच्या नशेत वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील व नंदोई उमेश काळे यांना दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केली, तसेच विशाल हा नेहमीच दारू पिऊन आईवडिलांबरोबरच पत्नीलाही शिवीगाळ व मारहाण करीत असे, तसेच दारू पिण्यासाठी पैसे न मिळाल्यास तो घरातील वस्तू विकत असे.
या त्रासाला कंटाळून त्याचे वडील गोकुळ पाटील व त्याचे दाजी उमेश काळे यांनी विशाल पाटील याच्या गळ्याला दोन्ही बाजूंनी ओढणी बांधून ओढले व आई शशिकला पाटील हिने विशाल पाटील याचे हात पकडून त्याचा आवाज दाबण्याकरिता त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याला जिवे ठार मारले.
या प्रकरणी मयत विशाल पाटीलची पत्नी पूजा पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला येऊन मृताचे वडील व दाजी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.