काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाची आत्महत्या
काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
पाणंद रस्ता रोखल्याने मानसिक तणावातून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण (वय ५४) यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , श्याम चव्हाण यांचा मानवत शिवारात खडी क्रशर मशीनचा व्यवसाय आहे. त्यांच्या जागेच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी शहरातील शिवाजी दहे यांनी जमीन खरेदी केली होती. या शेतातून पाणंद रस्ता होता.

हा रस्ता शिवाजी दहे यांनी रहदारीसाठी बंद केल्याने वाद होत होता. या प्रकरणाची तहसीलदार यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्याचा आदेश देण्यात आला. असे असताना दहे या रस्तावर रहदारी करू देत नव्हते. या कारणाने श्याम चव्हाण मागील काही दिवसांपासून तणावात होते.

या तणावात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरामागील गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे बंधू बालाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून शिवाजी विठ्ठलराव दहे आणि अमर शिवाजी दहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. श्याम चव्हाण मागील दहा वर्षांपासून काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

खिशात सापडली चिठ्ठी

मृत श्याम चव्हाण यांच्या पँटच्या मागील खिशात एक चिठ्ठी आढळली. यात 'शिवाजी विठ्ठलराव दहे व अमर शिवाजी दहे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवत आहे', असा मजकूर लिहला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group