नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्याकरिता शासनाकडून मिळणार्या ५० हजारांच्या अनुदानातून २० हजार रुपयांच्या वस्तू विद्यार्थ्यांना न देता स्वत:च्या फायद्याकरिता वापर करून सुमारे ४३ विद्यार्थ्यांची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम फाऊंडेशनच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशिक्षणार्थी युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी योगेश नारायण पानसरे यांची अशोकस्तंभ येथे प्रथम फाऊंडेशन नावाची प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत फिर्यादी युवतीसह सुमारे ४३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी या संस्थेत प्रवेश घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी शासनाकडून मिळणार्या ५० हजार रुपये रकमेच्या अनुदानातून एक फाईव्ह जी टॅब, कॉलेज बॅग, सर्व विषयांची पुस्तके, प्रत्येक विषयाकरिता नोटबुक व १२ पेन अशा अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या वस्तू फिर्यादी वाघमारे यांच्यासह इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणे अपेक्षित होते; मात्र प्रथम फाऊंडेशनचे संचालक योगेश पानसरे यांनी या वस्तू या विद्यार्थ्यांना न देता त्याचा स्वत:च्या फायद्याकरिता वापर केला.
त्याचप्रमाणे वर नमूद केलेल्या सर्व वस्तू प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मिळतील, अशा खोट्या आशयाची जाहिरात करून प्रवेश घेण्यास भाग पाडले. फिर्यादीसह इतर सर्व विद्यार्थी अनुसूचित जाती व जमातीचे विद्यार्थी असल्याचे माहीत असतानाही या विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले, तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले असतानासुद्धा त्यांचे दोन महिन्यांचे हजेरीपत्रक शासनास सादर केले नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची २० हजार रुपयांची रक्कम मिळू न देता विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून त्यांना अपमानित केले, तसेच आरोपी योगेश पानसरे याने स्वत:च्या फायद्यासाठी एकूण ४३ विद्यार्थ्यांची ८ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी युवतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी योगेश पानसरे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार दि. १६ डिसेंबर २०२४ ते १६ जून २०२५ या कालावधीत अशोकस्तंभ येथील प्रथम फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव करीत आहेत.