नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- हॉटेल कर्मचार्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा लाखांची खंडणी मागितल्याची घटना राणेनगरजवळ घडली.
याबाबत हुसेन हुमायून पुनावाला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १४ जून रोजी ते काम करीत असलेल्या हॉटेलमधील काम आटोपून ते घरी जात असताना पाथर्डी गाव सर्कलच्या अलीकडे चारचाकीतून आलेल्या चौघांनी पाथर्डी गाव कुठे आहे, अशी त्यांना विचारणा केली. पुनावाला हे त्याच परिसरात जात असल्याने त्यांनी आरोपींना सांगितले, की तुम्ही माझ्या मागे या, त्यानुसार ते पुनावाला यांच्या मागे जात होते. पाथर्डी गावाच्या पुढे हनुमान मंदिर क्रॉस झाल्यावर त्यांनी पुनावाला यांना अडवत त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना बळजबरीने गाडीत बसविले.
पुनावाला यांनी बसण्यास नकार देताच त्यांनी त्यांना मारहाण करीत बळजबरीने गाडीच्या मागील सीटवर बसविले. त्यांनी नंतर पुनावाला यांचा आयफोन हिसकावून घेतला. मोबाईल चेक करीत असताना पुनावाला यांना बँकेचे आलेले मेसेज आरोपींनी पाहिल्याने पुनावाला यांच्या खात्यात नऊ लाख रुपये असल्याचे त्यांना समजले. त्यांनी पुनावाला यांच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेत त्यांचा फोन तपासू लागले. रात्रभर त्यांना इकडेतिकडे फिरविल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर त्यांनी तीन ते चार पाण्याच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल घेतले व काही अंतराने पुनावाला यांना गाडीतून उतरवले.
या चौघांपैकी एक जण त्यांच्याजवळ आला व त्याने पुनावाला यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली. त्यांना नकार दिल्याने पुन्हा त्यांनी पुनावाला यांना गाडीत बसविले व पुन्हा इकडेतिकडे फिरवू लागले. त्यावेळी आरोपींनी पुनावाला यांच्या मोबाईलमध्ये एक आयडी तयार करून त्याला पुनावाला यांचे कागदपत्र जोडत ओटीपीसाठी स्वत:चा नंबर दिला. आरोपींनी दिवसभरात पुनावाला यांच्या मोबाईलमध्ये तीन ते चार अॅप डाऊनलोड करून या अॅप्सच्या माध्यमातून ४७ हजार, ४७ हजार, ५० हजार, ८० हजार, ७० हजार, ८७ हजार, ८० हजार व ४० हजार अशी आठ वेळा मिळून ५ लाख १ हजार रुपयांची रक्कम काढली.
ही रक्कम त्यांनी शेअर ब्रोकरला पाठवून बिटकॉईन, तसेच शेअर्समध्ये टाकली. त्यावेळी पुनावाला यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी "पुलिस के पास गया, तो तेरे हाथपैर काट देंगे, तेरे को काट कर मार देंगे,” अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. नंतर दि. १४ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राणेनगरजवळ त्यांना उतरवून दिले. या घटनेने भयभीत झालेल्या पुनावाला यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या हॉटेलमालकांना सांगितला.
हॉटेलमालकाने नंतर पुनावाला यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात घेऊन जात पोलिसांना पुनावाला यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुनावाला यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.