नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर येथे सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. गांधीनगर येथील प्रेसच्या भिंतीलगत दुचाकींवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगात असलेल्या राज्य परिवहनच्या बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तिसरा इसम गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दुपारी सुमारास गांधी नगर प्रेसजवळ झाडाखाली दोन दुचाकीस्वार आपापल्या वाहनांसह थांबले होते. यात संतोष एकनाथ संसारे (वय ४८, रा. सुंदरबन कॉलनी, लेखानगर, नाशिक) हे त्यांच्या स्प्लेंडर (MH 15 EN 2962) दुचाकीवर होते. दुसऱ्या दुचाकीवर सचिन काळे (MH 15 CR 9435) व त्यांची पत्नी रूपाली सचिन काळे (रा. गोदावरी सोसायटी, नारायण बापू नगर) हे थांबलेले होते.
तेवढ्यात पालघर विभागातील अर्नाळा बस डेपोची, अर्नाळा ते शिर्डी जाणारी एसटी बस (MH 20 BL 3254) भरधाव वेगात येत या तिघांवर धडकली. धडक एवढी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा मोठा आवाज झाला आणि घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली.
या धडकेत संतोष संसारे आणि रूपाली काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन काळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला रुग्णालयात हलवले आणि मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
या प्रकरणी बस चालक शरद गणपत भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासानुसार, चालकाने भरधाव वेगात बस चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.