नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसाने एकाचा बळी घेतला आहे तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. काहीशा विश्रांतीनंतर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसुल, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे.
या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 388 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आज 3.1 मिलिमीटर पाऊस दिवसभरामध्ये पडला असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला आहे. सायंकाळपर्यंत दारणा नदीतून ४२१४ क्यूसेस तर गंगापूर धरणातून 3 हजार 716 क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडलेलं होतं. त्यामुळे या दोन्हीही नद्या भरभरून वाहत आहेत.
जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे पेठ तालुक्यातील धानपाडा येथील रहिवासी गणपत गंगा कोदी हा 43 वर्षीय इसम एक तारखेला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नदी पार करत असताना वाहून गेला. त्याचे शव आज दमन गंगा नदीतील कामशेत या ठिकाणी सापडले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली असून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी गेलेला व्यक्ती हा पाय घसरून खाली पडल्यामुळे त्याचा शोध तातडीने त्र्यंबक तहसील कार्यालयाने स्थानिकांच्या मदतीने सुरू केलेला आहे. रात्री शोध मोहीम सुरू होती. परंतु शोध लागला नाही, असे आपत्ती विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. अधिक तपास याबाबत सुरू आहे.