बोरगाव:- सरण ही थकले मरण पाहुणी... मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील रोंघाने ग्रामपंचायत मधील जांभुळपाडा येथील स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे.
जांभूळपाडा येथे एका नागरिकाचे आकस्मिक निधन झाले. त्याचवेळी सकाळपासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नाही व जांभुळपाडा येथे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नसल्याने चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल, अपेष्टा सहन करावा लागत आहेत. या ठिकाणी छोटे नाले असल्याने नाल्यांना पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते.
अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांनी सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडला. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजूनही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे.
आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत जायला रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी छोट्या नाल्यातून गुडद्या एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
रोधाने ग्रामपंचायत मधील जांभुळपाडा येथे स्मशानभूमी शेड व रस्ता नाही. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात कोणाचे निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्या स सोयीचे होईल.", असे रोंघाने ग्रामपंचायतीचे सदस्य मुरलीधर घांगळे म्हणाले.
आम्ही लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही अजून पर्यंत आमच्या गावात स्मशानभूमी शेड होत नाही तरी पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमचं गाव मिळून आम्ही या निवडणुकी वरती बहिष्कार टाकू, असा इशारा जांभूळपाडा येथील ग्रामस्थ ज्ञानेश्वर वार्डे यांनी दिला.