इगतपुरी - तालुक्यातील घोटी येथे अंगावर झाड पडल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, सुरगाणा, पेठ या तालुक्यांसह नाशिक तालुक्यामध्ये आज संततधार पाऊस झाला. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 399 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. मधल्या काळात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.
शनिवारी सकाळी तालुक्यातील घोटी येथे जैन मंदिराजवळ झाडाच्या आडोशाला उभा असलेले ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील जरांडी गावामध्ये राहणारे बाळू शंकर शेलार या 48 वर्षीय इसमाच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तलाठ्यांसह इतर नागरिक धावत गेले. शेलार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.