नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहरातील परिमंडल दोनच्या हद्दीतील विविध ठिकाणी झालेल्या विविध साहित्याचे चोरीतील मिळालेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. त्यात ट्रक, मोटारसायकल, जेसीबी, रिक्षा, सोन्याचे दागिने असा पाच कोटी सात लाख 72 हजार 485 रुपये किंमतीच्या साहित्याचा समावेश आहे. चोरीस गेलेली आपापली वाहने व दागिने परत मिळताच संबंधित फिर्यादींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीतजास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अखत्यारीतील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले वाहने व दागिने फिर्यादींना परत करण्यात आले. त्यात 17 मोटारसायकली, 4 रिक्षा, 2 ट्रक, एक पोकलॅण्ड जेसीबी, 21 तोळे सोने, तसेच दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता. या उपक्रमांतर्गत दरमहा विविध गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून संबंधित फिर्यादींना परत करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी दि. 30 जून रोजी झालेल्या वाटपप्रसंगी विविध फिर्यादींसमोर बोलताना दिली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या संंबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, विभागीय सह पोलीस आयुक्त आणि मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी, कारकून यांनाही मोनिका राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.