सुधाकर बडगुजर यांची आज ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणते की ते भाजपात प्रवेश करतील तर कोणी म्हणते ते शिवसेनेत जातील.
याबाबत बोलताना शिवसेनेचे महानगरप्रमुख बंटी तिदमे म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बाँम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनीही बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते.
त्यामुळे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील. सुधाकर बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी साठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोपही प्रसिद्ध झाले आहेत.
शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत.
मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील.