सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात आज घडल्या
सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात आज घडल्या "या" घटना
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे. सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा येथे बालवाडीची भिंत कोसळली आहे. दुगारवाडी मध्ये अडकून पडलेल्या सुमारे 12 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. सातपूर येथील ३२ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सुरगाणा तालुक्यात दरड कोसळली आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये 31.1 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
प्रशासनाने गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

शहर आणि जिल्हा परिसरामध्ये सातत्याने पाऊस
मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून ३७१६ क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर वाढ करून सकाळी १० वाजता गंगापूर धरणातून ४६५६ मध्ये ५३० क्युसेसने वाढ करून ५१८६ क्युसेस इतके करण्यात आले आहे. रामकुंड  परिसरात काही प्रमाणात  पुराचे पाणी आले होते. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या होळकर पुलाखालून ८ हजार क्युसेस वेगाने पाणी वाहत आहे. तर गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागले आहे.

गंगापूर धरण 60.00 टक्के भरले असून धरणातून आतापर्यंत ३० हजार ८५३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दिंडोरीत २०५.१ मिमी पाऊस झाला आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये  ७६९.३ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.

इगतपुरी, घोटीमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आज दारणा धरणातून एकूण ८५८० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  सातत्याने जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती कायम आहे. तसेच नांदूर मधमेश्वर धरणामधून दिवसभर 31 हजार 135 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता 6997 क्युसेसने हा विसर्ग वाढला असून एकूण 39 हजार 132 क्युसेस पाणी नांदूर मधमेश्वर धरणातून हे सोडण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सुरगाणा तालुक्यात ठाणापाडा या ठिकाणी बालवाडी ची इमारत जुनी झाल्याने या जुन्या इमारतीची भिंत कोसळली आहे तर गावातील तुकाराम पवार यांच्या घराची भिंत देखील पाण्यामुळे खचल्याने पडली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या दुगारवाडीच्या धबधबा या ठिकाणी सुमारे 12 पर्यटक हे अडकून पडले होते. याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने या पर्यटकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आलेली आहे तर त्र्यंबकेश्वर येथे एका छोट्या तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेला व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तातडीने रेस्क्यू टीम पाठविण्यात आली होती.

या टीमने सायंकाळच्या सुमारास या तळ्यातून मनीष पवार (वय 32, रा. सातपूर) याचा मृतदेह बाहेर काढला असून अधिक तपासणीसाठी त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेला आहे. 
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील आंब्याठा घाटामध्ये दरड कोसळली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग म्हणून उंबरठाणा पिंपळखेड मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group