नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भरधाव मोटारसायकलस्वाराने रिक्षाला कट मारल्याने रिक्षा दुभाजकाला घासून पलटी झाल्याने एक वृद्ध ठार, तर रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना तपोवनात घडली.
फिर्यादी संतोष अशोक बर्डे (रा. आगरटाकळी, नाशिक) हे रिक्षाचालक असून, त्यांच्या भागात राहणारा मित्र नाद हरी औटे (वय 63, रा. राजवाडा, टाकळी गाव) याच्यासह ते एमएच 15 एफयू 8696 या क्रमांकाच्या रिक्षाने गंगेवरील काम आटोपून घराकडे जात होते.
तपोवनातील कृषी गोशाळा ट्रस्टजवळून जात असताना रिक्षाच्या पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने रिक्षाला कट मारला. त्यामुळे ही रिक्षा दुभाजकाला घासून पलटी झाली. यावेळी रिक्षात पाठीमागे बसलेला मित्र नाद औटे व रिक्षाचालक खाली पडले.
या अपघातात औटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते ठार झाले, तर रिक्षाचालकास दुखापत झाली असून, रिक्षाचे नुकसान झाले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजुळे करीत आहेत.