नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील भारत भूषण सोसायटीतील शांती बंगल्यामध्ये गुरुवारी सकाळी अशांतता पसरली. वातानुकूलित यंत्र ( AC) दुरुस्तीच्या कारणाने बळजबरीने घरात घुसून धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न भरदिवसा घडला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील भारत भूषण सोसायटीत राहणारे रामदास गोविंद पगारे (वय 76) व त्यांची सून नीलम पगारे हे घरात होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी रेनकोट व डोक्यात हेल्मेट तसेच हातात हँगलोज घालून बंगल्यात प्रवेश केला. एसी ना दुरुस्त असून त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आलो असल्याचे सांगत घराचे दार उघडण्यास सांगितले. मात्र, आम्ही एसी दुरूस्तीसाठी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नसल्याचे सांगताच बाहेरून आलेल्या इसमांनी धक्का देऊन पगारे यांना घरात ढकलले व घराचे दार आत मधून बंद केले. त्यानंतर वृद्धास व त्यांच्या सुनेस वेगवेगळ्या खोल्यांमध्ये डांबून ठेवले व वृद्धाच्या डोक्याला पिस्तूल लावून व गळ्याला चाकू लावून कपाटातील चाव्यांची मागणी केली.
या झटापटीत पगारेंच्या हाताला किरकोळ जखम झाली. यानंतर दोघांना बांधून ठेवल्यानंतर चोरांनी आपला मोर्चा कपाटाकडे वळवला. कपाटाचे लॉक तोडले. मात्र त्यात पैसे, दागिने काहीच मिळाले नाही. त्यानंतर या भुरट्या चोरांनी कपाटात असलेले लहान मुलांचे कपडे, साड्या पिशवीत भरल्या व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण येऊ नये म्हणून त्याचा डीव्हीआर काढून पळ काढला. काही वेळातच पगारे यांनी आपली सोडवणूक करून सुनेला सोडवले व पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकातील अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. मात्र चौघेजण दोन गाड्यांवर पळून गेल्याने श्वान पथकाला त्यांचा माग काढणे शक्य झाले नाही. पोलिसांची आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिडगर करीत आहे.