नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कुरिअर कंपनीच्या गाळ्याचे शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 32 लाख 17 हजार रुपये किमतीचे 160 मोबाईल असलेले 16 बॉक्स घरफोडी करून चोरून नेल्याची घटना मुंबई नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गजानन धोंडू होनपारखी (रा. समता चौक, सिडको) हे मुंबई नाका येथे माधव प्लाझामध्ये असलेल्या गाळा नंबर 4 मधील एसएम ई-कार्गो प्रा. लि. या कुरिअर कंपनीचे काम पाहतात. अज्ञात चोरट्याने दि. 9 ते 10 जानेवारीदरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास कुरिअर कंपनीच्या गाळ्याचे शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून ऑफिसमध्ये प्रवेश केला.
यावेळी अज्ञात चोरट्याने गाळ्यात असलेल्या 16 बॉक्समधील एकूण 32 लाख 37 हजार 29 रुपये किमतीचे विवो कंपनीचे एकूण 160 नवीन मोबाईल फोन घरफोडी करून चोरून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेग करीत आहेत.