सातपूरमध्ये 16 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ
सातपूरमध्ये 16 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ
img
दैनिक भ्रमर

सातपूर (मंगेश एरंडे) - अशोकनगर परिसरात एका १६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव कु. यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. पवार संकुल, अशोकनगर) आहे. यशराज हा मॉर्डन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशराज हा आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ हिरे  गार्डन जवळील खासगी शिकवणीजवळ उभा असताना तो अचानक खाली कोसळला.

तातडीने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही नागरिकांनी दावा केला आहे की, यशराज आणि त्याच्या मित्रामध्ये शिकवणीत बसण्याच्या वादातून हाणामारी झाली असून यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. शवविच्छेदनांतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू होते.

या घटनेने यशराजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस करत असून, घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट झालेली नाही, ते शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group